७० टक्के महाविद्यालयांना कायमस्वरूपी संलग्नता नाही; सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:04 AM2018-07-30T01:04:38+5:302018-07-30T01:04:48+5:30
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या ७१९ महाविद्यालयांपैकी केवळ २०४ महाविद्यालयांनाच कायमस्वरूपी संलग्नता मिळालेली असून, उर्वरित ५१५ महाविद्यालये तात्पुरती संलग्नता मिळवतात व वेळ मारून नेतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या ७१९ महाविद्यालयांपैकी केवळ २०४ महाविद्यालयांनाच कायमस्वरूपी संलग्नता मिळालेली असून, उर्वरित ५१५ महाविद्यालये तात्पुरती संलग्नता मिळवतात व वेळ मारून नेतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने व विद्यापीठाची संलग्नता मिळवण्याचे निकष पूर्ण करण्यात या महाविद्यालयांना अपयश येत असल्याने कायमस्वरूपी ऐवजी तात्पुरती संलग्नता देण्यात येते.
माहिती अधिकारातून २०१० ते २०१७ या कालावधीतील विद्यापीठाच्या वाटचालीबाबत कॅगच्या अहवालातून वस्तुस्थिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे प्रकार केवळ आताच सुरू नसून गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीने काम सुरू आहे. काही महाविद्यालयांबाबत हा प्रकार १९८९ पासून सुखनैव पद्धतीने सुरू आहे. किती महाविद्यालयांना संलग्नता दिली, किती जणांनी आवश्यक निकष पूर्ण केले, किती जणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले, या बाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
कायमस्वरूपी संलग्नता मिळवण्यासाठी महाविद्यालयात अर्हताधारक प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकांचे पुरेसे प्रमाण, पूर्ण वेळ अर्हताधारक प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, पुरेशी जागा, स्वतंत्र इमारत, वर्गखोल्या, वाचनालय, ग्रंथालय, संगणक कक्ष, शौचालय, प्रयोगशाळा, पिण्याचे शुद्ध पाणी अशा सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, हे निकष पूर्ण करण्यात अपयश येत असल्याने तात्पुरती संलग्नता मिळवली जात असल्याचे समोर आले.
- अर्हताधारक प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकांचे पुरेसे प्रमाण, पूर्णवेळ प्राचार्य, स्वतंत्र इमारत, वर्गखोल्या, संगणक कक्ष, शुद्ध पाणी अशा सुविधा नसल्यास कायमस्वरूपी संलग्नता मिळत नाही.