७० टक्के सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोसायट्यांचे दरवाजे अजूनही बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:07 AM2020-07-02T04:07:00+5:302020-07-02T04:07:15+5:30

दूधवाला, भाजीवाला, चालकांची अडवणूक नाही

In 70% of the societies, the doors of the societies are still closed for housewives | ७० टक्के सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोसायट्यांचे दरवाजे अजूनही बंदच

७० टक्के सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोसायट्यांचे दरवाजे अजूनही बंदच

Next

सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मिळून सुमारे ३५ हजार सोसायट्या असून यापैकी ६० ते ७० टक्के सोसायट्यांमध्ये अजूनही घरकाम करणाºया महिलांना कोरोनाचे कारण पुढे करीत प्रवेश नाकारला जात आहे. प्रवेश नाकारणाऱ्यांमध्ये उच्चभ्रू सोसायट्यांचा भरणा अधिक आहे. बहुतांश सोसायट्यांमध्ये दूधवाला, भाजीवाला, चालक, प्लंबर, वायरमन यांना प्रवेश दिला जात असताना घरकाम करणाºया महिलांवरच अन्याय का, असा सवाल आता घरेलू कामगार नेत्यांकडून केला जात आहे.

सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे निमगावकर यांनी सांगितले की, मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता एसआरए इमारतीतील सोसायट्यांमध्ये घरकाम करणाºया महिलांना प्रवेश मिळत आहे. मात्र उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. घरकाम करणाºया महिला दिवसभरात तीन ते चार घरांमध्ये काम करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे कारण प्रवेश नाकारणाºया सोसायट्यांनी दिले आहे. काही सोसायट्यांमधील सभासदांना या महिलांना प्रवेश द्यायचा आहे, कारण त्यांच्या घरी काम करण्यासाठी कोणी नाही. मात्र केवळ अध्यक्ष आणि सचिव परवानगी देत नसल्याने त्यांचा नाइलाज आहे.

तर महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू आणि मुंबई उपनगर जिल्हा को-आॅप. हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र मोरे यांनीही आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेत ज्येष्ठ नागरिक, रुग्ण असलेल्या घरात मोलकरणींना प्रवेश द्यावा. सर्वच ठिकाणी सुरक्षा बाळगत त्यांना सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण याकडे पाहिले पाहिजे, असे म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घरकामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाºयांना, घरकामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यापूर्वीच केले.

मुंबईतला महत्त्वाचा घटक म्हणजे घरकामगार महिला. त्या २१ मार्चपासून घरात आहेत. मोलकरणींचे पोट हातावर आहे. प्रत्येकाच्या घरी परिस्थिती सारखीच असेल असे नाही. अनेकींचे पती बिगारी, नाकाकामगार आहेत. काहींना व्यसने आहेत. लहान मुले आहेत. मुलांचे शिक्षण आहे. घरखर्च आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

Web Title: In 70% of the societies, the doors of the societies are still closed for housewives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.