राज्यात खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण - कृषिमंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:40+5:302021-07-14T04:08:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरिपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख ...

70% sowing of kharif completed in the state - Agriculture Minister Dadaji Bhuse | राज्यात खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण - कृषिमंत्री दादाजी भुसे

राज्यात खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण - कृषिमंत्री दादाजी भुसे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरिपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून, अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून, हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्यात ऊस पिकासह खरिपाचे क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

कोकण विभागात खरिपाचे ४.४२ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ०.९८ लाख हेक्टर (२२.१७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात २१.१९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, त्यापैकी ११.२६ लाख हेक्टर (५३.१२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात ८.६७ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, आतापर्यंत ६.४१ लाख हेक्टर (७३.९९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरिपाचे क्षेत्र ८.०३ लाख हेक्टर असून, ६.७३ लाख हेक्टर (८३.७७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात २०.२३ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, त्यापैकी १७.५२ लाख हेक्टर (८६.६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरिपाचे क्षेत्र २७.९४ लाख हेक्टर असून, त्यापैकी २४.२८ लाख हेक्टर (८६.९०टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ३२.२४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २६.२९ लाख हेक्टर (८१.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११.२९ लाख हेक्टर (५८.६५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

राज्यात अद्याप काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून, खरिपाशी निगडित कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे डवले यांनी स्पष्ट केले.

Web Title: 70% sowing of kharif completed in the state - Agriculture Minister Dadaji Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.