Join us

भांडुपमध्ये ७० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:05 AM

दागिने गायब; लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक संशयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडुपमध्ये एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची ...

दागिने गायब; लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक संशय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भांडुपमध्ये एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली. महिलेच्या अंगावरील दागिनेही गायब आहेत. लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

भांडुप पश्चिमेकडील क्वारी रोड येथील फुगावाला कंपाउंड परिसरात रतनलाल मोहनलाल जैन (७०) या एकट्याच राहत हाेत्या. त्यांना मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास मोलकरीण नेहमीप्रमाणे कामावर आली. तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या अंगावरील दागिनेही गायब आहेत. स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून दुपारी १२ च्या सुमारास घटनेची वर्दी लागताच भांडुप पोलीस तेथे दाखल झाले.

त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी दिली.

* महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित

राष्ट्रीय गुन्हे नाेंदणी विभागाने (एनसीआरबी) २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली आहे. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे. संपूर्ण राज्यात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७ हजार ६९६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात ६ हजार १६३ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (४१८४), गुजरात (४०८८) आणि तमिळनाडू (२५०९) अशी राज्ये आहेत.

२०१७ मध्ये ५ हजार ३२१ तर २०१८ मध्ये ५ हजार ९६१ गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ मध्ये १५८ वृद्धांंच्या हत्येची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

......................................................