Join us

धक्कादायक! प्रतिदिन 70 तरुणी बेपत्ता, तीन महिन्यांत ५ हजार ६१० तरुणी गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 6:27 AM

दिवसाला सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहे. 

मुंबई : एकीकडे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून वातावरण तापले असताना, राज्यातून गेल्या तीन महिन्यांत ५ हजार ६१० तरुणी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्चमध्ये सर्वाधिक २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसाला सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहे. 

 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक ट्वीट  करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, जानेवारीत महाराष्ट्रातून १,६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारीत १,८१० तर मार्चमध्ये २,२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरेतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे.

पोलिस होण्यापूर्वीच बेड्या! भरती परीक्षेदरम्यान चार कॉपी बहाद्दरांवर कारवाई

 मात्र, तसे होताना दिसत नाही. राज्य महिला आयोग गेल्या १६ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मिसिंग विभागाकडून वेळोवेळी आम्ही माहिती, अहवाल मागवत असतो. प्रत्येक ठिकाणी मिसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही, याची माहिती घेत आहोत. 

 गृह विभागाला आवाहन... 

महिला आयोगाने गेल्या महिन्यात नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग जनजागृती एक प्रोग्रामही घेतला. त्यावेळी राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्य:स्थितीतली आव्हाने आणि उपाययोजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठविला आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचे आमिष, प्रेमाचे  आमिष आणि नोकरीचे आमिष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असे नमूद करीत, याबाबत गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईरुपाली चाकणकरपोलिस