मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून वीज बिल न भरणाऱ्या चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीमधील सुमारे ७०० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय अदानी इलेक्ट्रिसिटीने घेतला आहे. अदानीकडून सिद्धार्थ कॉलनीतील ३,२५० ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.
जुलै २०१९ मध्ये पूर्वीची थकबाकी गोळा करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली गेली. यावेळी नागरिकांनीही चालू महिन्यापासून वीज देयकांचा भरणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार मोहीम स्थगित करण्यात आली. त्यानंतर बहुतांश ग्राहक हे वीज देयकांचा नियमित भरणा करत आहेत. मात्र हे ७०० ग्राहक याला अपवाद आहेत. ही थकबाकीची रक्कम आता २.५ कोटी रुपये झाली आहे.
सुमारे ८० टक्के ग्राहक हे नियमितपणे त्यांच्या वीज देयकाचा भरणा करत आहेत, जवळपास २० टक्के (७००) ग्राहक यांनी मात्र गेल्या दोन वर्षांपासून विजेचा वापर करूनसुद्धा देयकाचा भरणा करण्यास नकार देत आहेत. याचा बोजा सर्वसामान्य ग्राहक जे नियमितपणे वीज देयकांचा भरणा करत आहेत त्यांच्यावर पडत आहे. ज्यांनी जून २०१९ पासून आपल्या देयकांचा भरणा केलेला नाही, अशाच ग्राहकांच्या विरोधात मोहीम उघडली जात आहे. या ग्राहकांना यापूर्वी अनेक वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. या ग्राहकांच्या देयके न भरण्यामुळे इतर ग्राहकांवर बोजा पडत आहे, जे नियमितपणे आपली देयके भरत आहेत.