७०० बेकायदा बांधकामांचा ‘मिठी’च्या रुंदीकरणात खोडा; पालिकेपुढे आव्हान
By सीमा महांगडे | Published: January 9, 2024 09:34 AM2024-01-09T09:34:44+5:302024-01-09T09:39:35+5:30
फेब्रुवारीअखेर बेकायदा बांधकामांवर कारवाई.
सीमा महांगडे, मुंबई : गेल्या १० वर्षांपासून कलिना पूल ते सीएसटी पुलादरम्यान ९०० मीटर क्षेत्रात, नदीपात्रात, नदीच्या काठावर अशी ७०० बांधकामे आहेत. ही नदी रुंदीकरण प्रकल्पाला अडथळा ठरत आहेत. पालिकेकडून यामधील अधिकृत व बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, फेब्रुवारीअखेर यामधील बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार आहे. मात्र, मागील दशकापासून असलेली ही बांधकामे हटविणे म्हणजे पालिकेसाठी मोठे आव्हान असल्याची माहिती पालिका अधिकारी देत आहेत.
१८ वर्षांपूर्वी २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर मिठी नदी प्रकल्प हाती घेण्यात आला. पालिका आणि ‘एमएमआरडीए’ने संयुक्तपणे हाती घेतलेल्या या प्रकल्पात हजारो झोपड्यांचे अतिक्रमण, रुंदीकरण यासह विविध कामे हाती घेण्यात आली. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम चार टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे.
यामध्ये विमानतळ टॅक्सी-वे पूल कुर्ला ते अशोकनगर अंधेरी पूर्व किनारा, विमानतळ टॅक्सी-वे पूल कुर्ला ते अशोकनगर पश्चिम किनारा, वांद्रे कुर्ला संकुल एमटीएनएल ते विमानतळ टॅक्सी-वे पूल कुर्ला, अशोकनगर अंधेरी ते पवई फिल्टरपाडा या टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे.
पुढील ८ दिवसांत नोटिसा :
महानगरपालिकेच्या नोटिशीविरोधात काही गोदाममालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या दहा वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित होती मात्र पालिकेकडून यासंदर्भातील पहिली निष्कासन कार्यवाही नोव्हेंबरमध्ये हाती घेण्यात आली.
याअंतर्गत मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या ५६ बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. आता पालिकेकडून यापुढील मोहीम हाती घेण्यात आहे.
सर्व बांधकामांची छाननी करून वैध बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी जागेची सोय केली जाणार आहे. त्या पद्धतीच्या नोटिसा ८ दिवसांत पाठविण्यात येणार आहेत.