Join us

मुंबईत ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत ७ हजार वाहनांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:04 AM

२५२ ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन : १ हजार ७५९ चालकांवर कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात ...

२५२ ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन : १ हजार ७५९ चालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत ३ तासांत मुंबईतील ७ हजार ३४७ वाहनांची तपासणी करत १ हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. यात पाचही प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरु होते.

या दरम्यान मुंबईत २०१ ठिकाणी नाकाबंदी करत ७ हजार ३४७ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत ७५ वाहनांचा समावेश आहे. २५२ ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील १ हजार ३६ आरोपी तपासण्यात आले. त्यात ३८३ आरोपी मिळाले. ड्रग्जविरोधात अमली पदार्थविरोधी पथकाने ९९ जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण ३५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली.

तसेच ८१५ हॉटेल, लॉज, मुसाफिर खान्याची झाडाझडती घेण्यात आली. अवैध धंद्यावर ४३ ठिकाणी छापे टाकून ६९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.