लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चार वर्षांपूर्वी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणवत, पोलिसाला ७० हजारांचा चुना लावणाऱ्या एका महिलेला मंगळवारी एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली. पूजा नीलेश ठक्कर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उत्तराखंडमधून तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ती अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
चार वर्षांपूर्वी एअरपोर्टवर व्हीआयपी चेकिंग पोस्टवर तानाजी विश्वनाथ हे पोलीस निरीक्षक तैनात होते. त्या दरम्यान, त्यांची ठक्करसोबत ओळख झालेली. तिने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणवत, तिच्याकडे असलेले डॉलर पैशात कन्व्हर्ट करायचे असल्याचे सांगितले, तसेच सध्या तिच्याकडे पैसे नसल्याने ७० हजार रुपयांची मागणी केली. ही बाब खरी वाटल्याने विश्वनाथ यांनी तिला पैसे दिले. मात्र, तिने ते परत केलेच नाही. त्यांनी मागणी केल्यावर तुमच्या बँक खात्यात ७५ हजार रुपये पाठविल्याचे उत्तर तिने दिले. मात्र, प्रत्यक्षात तिने पैसे दिलेच नाही. अखेर त्यांनी या प्रकरणी न्यायालयामार्फत तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. तिच्यावर मुंबईसह, नाशिक, नागपूर, गुजरात व उत्तराखंडमध्ये फसवणुकीचे ७ गुन्हे दाखल आहेत.