मध्य रेल्वेवर उद्यापासून रोज धावणार ७०६ फेऱ्या, प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:45 AM2020-10-18T11:45:33+5:302020-10-18T11:50:53+5:30
७०६ फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर दररोज ३०९ आणि जलद मार्गावर १९० फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. परंतु सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेमार्गावर ४८१ लोकल सेवा चालवण्यात येत होत्या. आणखी २२५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. एकूण ७०६ फेऱ्या होणार आहेत. १५ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेने २८ फेऱ्या वाढविल्या होत्या, त्यावेळी ७०० फेऱ्या होणार असल्याचे संकेत दिले होते.
सर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले होते. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. पण रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यास हरकत नाही, असेही राज्य सरकारने सांगितले होते. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर ४२३ फेऱ्या होत होत्या. १० ऑक्टोबरपासून त्यामध्ये २२ फेऱ्यांची वाढ करण्यात आली. एकूण ४५३ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. १५ ऑक्टोबरपासून २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी आता १९ ऑक्टोबरपासून आणखी २२५ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने १५ ऑक्टोबरपासून १९४ अतिरिक्त फेऱ्या वाढविल्या होत्या. एकूण ७०० फेऱ्या चालविल्या जात आहेत. यामध्ये
१० एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.
कशा असतील ७०६ फेऱ्या
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर १९ ऑक्टोबरपासून ७०६ फेऱ्या होणार आहेत. यापैकी मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर ३०९ आणि जलद मार्गावर १९० फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. तर हार्बर मार्गावर १८७ फेऱ्या आणि ट्रान्सहार्बर मार्गावर २० फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.