मुंबई- गेल्यावर्षामध्ये एकिकडे विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असतानाच दुसरीकडे विमान कंपन्यांविरोधातील तक्रांरीमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वर्षभरामध्ये देशातील विविध कंपन्यांच्या विरोधात एकूण ७१२ तक्रारी नागरी विमान महासंचालनालयाकडे (डीजीसीए) प्राप्त झाल्या आहेत.
विमान कंपन्यांविरोधात ज्या तक्रारी प्रामुख्याने दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी विमान विलंबाच्या होत्या. तर विमान प्रवास रद्द झाल्यानंतर तिकीटांच्या पैशांच्या परताव्यासंदर्भात असलेल्या तक्रारींचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. या एकूण ७१२ तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी या स्पाईस जेट कंपनीच्या विरोधात होत्या. त्या तक्रारींची संख्या ही ४२२ इतकी आहे. तर त्यानंतर एअर इंडिया कंपनीच्या विरोधात ६८ तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यानंतर इंडिगो कंपनीच्या विरोधात एकूण ६५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.