पसंतीच्या महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांना आस तिसऱ्या गुणवत्ता यादीची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी एसईबीसी संवर्ग वगळल्याने दुसऱ्या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात आवश्यक ते बदल करून संवर्ग बदलण्यासाठी मुभा प्रवेश समितीने दिली होती. त्यानुसार, दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी ७१४ विद्यार्थ्यांनी एसईबीसींचा आपला संवर्ग बदललून खुल्या गटातून अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्य शासनाकडून शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांमधून एसईबीसीच्या जागा खुल्या गटात समाविष्ट करत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एसईबीसी संवर्गातून अर्ज केले त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना अर्जात संवर्ग बदलण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विभागातील ७१४ विद्यार्थ्यांनी एसईबीसीच्या संवर्गातून अर्ज केले. एसईबीसीचे आरक्षण वगळून विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावे लागणार आहे. गुण जास्त असले, तरी नामांकित महाविद्यालयातील जागा लवकर भरत असल्यामुळे, एसईबीसी आरक्षणातून पसंतीच्या नामांकित महाविद्यालयात जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता खुल्या गटातून दुसऱ्या गुणवत्ता यादीतही प्रवेश मिळाला नसल्याने, पसंतीच्या महाविद्यालयात जागा मिळण्याची आशा धूसर झाल्याची प्रतिक्रिया ९० टक्के मिळूनही अद्याप प्रवेश न मिळालेल्या जान्हवी बागवे या विद्यार्थिनीने दिली.
दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून तब्बल ४८,१७० विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत, तर राज्यात दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी २,५५,८३८ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी केवळ ६४,६१४ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे.