Join us

घाटकोपरमधून ७२ लाखांची रोकड जप्त; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई

By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2024 11:50 AM

आयकर विभागाकडून तपासणी सुरू

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या निलयोग मॉल बाहेरील एका कारमधून इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्वेलन्स स्कोडने केलेल्या तपासणीत ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपयांची रोकड जप्त केल्याने उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे. दोघांना ताब्यात घेत, ही रक्कम वाशीतील विकासकाची असल्याचे सांगितले. आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलयोग मॉल च्या समोर, विधानसभा मतदारसंघ -१७० घाटकोपर पूर्व या ठिकाणी एका फोर व्हीलर वाहनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास निवडणूक सेलने  वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये ७२,३९,६७५ रुपये मिळून आले आहेत. या वाहनांमध्ये दिलीप वेलजी नाथानी ५२ वर्षे, अतुल वेल्जी नाथांनी वय ५४ वर्षे दोघे जण मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ते इन्कम टॅक्स प्रॅक्टिसनर व सी.ए आहेत. त्यांना ही रोख रक्कम वाशी मधील अक्षर ग्रुप बिल्डर भरत पटेल यांनी दिली असल्याचे सांगितले. वाहनसहित  दोघांना ताब्यात घेत पंतनगर पोलीस ठाण्यात आणले. तेथे डेप्युटी कलेक्टर रवींद्र ठाकरे तसेच तहसीलदार वृषाली पाटील व इतर अधिकारी, इन्कम टॅक्स चे अधिकारी मनीष कुमार यांनी चौकशी केली. तसेच, आयकर विभागाने रक्कम चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.

चौकशीअंती यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यामध्ये पुढे काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४घाटकोपर