मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने देशभरात २१ जून पासून लसीकरण मोहीम राबविली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या दृष्टीने महाराष्ट्राला जून महिन्यात ७२ लाख लसीचे डोस देण्याचे वितरण आदेश केंद्र सरकारने जारी केले. त्यापैकी ४० लाख डोस आजपर्यंत मिळाले असून ३२ लाख डोस ३० जून पर्यंत मिळतील.
जुलै महिन्यात किती डोस मिळणार त्याचे वितरण जूनच्या शेवटच्या आठवड्यात येईल. महाराष्ट्रात रोज पाच ते सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र मिळणाऱ्या लसीचे प्रमाण त्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटाच्या लोकांना लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत २ कोटी ७५ लाख ७६ हजार १७७ लोकांचे लसीकरण झाले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७५ लाख ७६ हजार १७७ लोकांचे लसीकरण झाले असून ५४ लाख ७६ हजार ३१७ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
१८ ते ४४ चे नियाेजन
१८ ते ४४ वयोगटाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय झाला असला तरी महाराष्ट्रात त्याचे नियोजन तीन टप्प्यात करण्यात आले आहे. सध्या ३० ते ४४ आणि ४५ वर्षाच्या पुढील लोकांना सध्या लसीकरण सुरू आहे. १८ ते २९ वयोगटाच्या लोकांना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रात २ जून ते १९ जून या कालावधीमध्ये कोविशिल्ड लसीचे ३४,८९,१९० डोस मिळाले आहेत.
तीन वेळा लसींचा पुरवठा
कोव्हॅक्सिन लसीचे ५,६७,०६० डोस महाराष्ट्राला उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही लसीचे जून महिन्यात ४०,५६,२५० डोस राज्याला मिळाले आहेत आणखी ३२ लाख लसीचे डोस जून अखेरीस उपलब्ध होतील. सध्या केंद्र सरकारकडून पंधरा दिवसात तीन वेळा लसीचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. १८ ते २९ वयोगटाच्या लोकांना जुलै महिन्यापासून लसीकरण सुरू केले जाईल, असा अंदाज आरोग्य विभागाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.