७२ वर्षीय गिर्यारोहक नेपाळमध्ये अडकले...

By admin | Published: April 29, 2015 02:06 AM2015-04-29T02:06:42+5:302015-04-29T02:06:42+5:30

एव्हरेस्ट शिखरासह अंटार्क्टिकावर तिरंगा रोवणारे ७२ वर्षांचे गिर्यारोहक अश्विन पोपट आणि त्यांचे दोन पुतणे नेपाळमध्ये अडकून पडले आहेत

72-year-old mountaineer stuck in Nepal ... | ७२ वर्षीय गिर्यारोहक नेपाळमध्ये अडकले...

७२ वर्षीय गिर्यारोहक नेपाळमध्ये अडकले...

Next

मनीषा म्हात्रे - मुंबई
एव्हरेस्ट शिखरासह अंटार्क्टिकावर तिरंगा रोवणारे ७२ वर्षांचे गिर्यारोहक अश्विन पोपट आणि त्यांचे दोन पुतणे नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. भूकंपाने नेपाळ उद्ध्वस्त केले तेव्हा पोपट कुटुंबाने गोसाईकुंड शिखरावर चढाई सुरू केली होती. भूकंपाने केलेल्या संहाराची त्यांना कल्पनाही नव्हती. मुलुंडमध्ये राहणाऱ्या कुटुंबाने त्यांना भूकंपाची माहिती दिली़ त्यानंतर अश्विन व त्यांच्या पुतण्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. यानंतर २४ ते ३० तासांच्या अंतराने अश्विन यांनी धाडलेले फक्त दोन एसएमएस कुटुंबाला मिळाले. हमे यहासे निकालो, हा त्यातला एसएमएस कुटुंबाला सुन्न करून गेला.
मुलुंडच्या देवीदयाल रोडवर राहणाऱ्या अश्विन यांना लहानपणापासून गिर्यारोहणाचा छंद जडला. आजवर अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केले. अत्यंत खडतर समजले जाणारे अंटार्क्टिकातले गिर्यारोहणही अश्विन यांनी आपल्या कुटुंबासह पार केले. त्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. वय झाल्याने आता गिर्यारोहण थांबवा, ही कुटुंबाने केलेली सूचना धुडकावून अश्विन २१ मार्चला आपल्या दोन पुतण्यांना - रवी व नमन यांना सोबत घेऊन नेपाळला रवाना झाले. नेपाळचे गोसाई कुंड सर करण्याची मोहीम त्यांनी आखली होती. काठमांडुमधील धुंचे येथे त्यांचा बेस कॅम्प होता. तेथून त्यांनी चढाई सुरू केली. चढाई करतानाही ते मुलुंडच्या घरी मागे राहिलेल्या पत्नी शकुंतला, मुलगी ऊर्मी आणि जस्मीन यांच्या संपर्कात होते. वाटेतली लोभस दृश्ये त्यांनी मोबाइल, कॅमेऱ्यात टिपली आणि ती कुटुंबाला व्हॉट्सअ‍ॅपने धाडली. सर्व आलबेल सुरू असताना २५ एप्रिलला भूकंपाने नेपाळ हादरला. भूकंपाच्या विनाशाची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर पाहून मुलुंडचे पोपट कुटुंब बिथरले. त्यांनी तत्काळ अश्विन, पुतणे रवी व नमन यांना फोनाफोनी सुरू केली.
घरातला फोन अन्य नातेवाइकांची काळजी घेऊन सतत खणखणू लागला. आम्ही डॅडींना सतत फोन करीत होतो. पण त्यांचा फोन लागत नव्हता. रवी, नमनचीही तीच स्थिती होती. जसजसा वेळ जात होता तसतशी घरातली अस्वस्थता आणखी वाढू लागली. फोन खणखणला, मोबाइलची रिंग वाजली, एसएमएस आला की वाटे डॅडींचा. आम्ही धावत जाऊन फोन उचलू. तो दुसऱ्याचाच असे. आम्ही असंख्य एसएमएसही धाडले. त्यातले त्यांना काही मिळाले, काही अडकले. डॅडींकडून उत्तर मिळत नव्हते. आईचा धीर सुटू लागला. एका क्षणी तिने हंबरडा फोडला. ते पाहून आम्हीही खचलो, ऊर्मी सांगत होती.
याच दरम्यान डॅडींचा एसएमएस आला, क्या हुआ? हम यहा ठिक है... ते वाचून आम्ही आणखी गोंधळलो. बहुधा त्यांना भूकंपाची माहिती नव्हती. आम्ही त्यांना भूकंपाची कल्पना दिली. तिथल्या विनाशाची माहिती दिली आणि ट्रेकिंग तिथल्या तिथे थांबवून तत्काळ बेस कॅम्पला परतण्याचे आवाहन केले. त्यानंतर पुन्हा संपर्क तुटला. २४ तास पुन्हा शांतता पसरली. अस्वस्थता, भीती मात्र आणखी वाढली होती. डॅडींचे काय झाले असेल, ते सुरक्षित असतील ना या विचाराने पुन्हा काहुर माजले. मात्र दुसऱ्या दिवशी डॅडींचा एसएमएस आला. ते धुंचे गावात लष्करी जवानांनी उभारलेल्या छावणीत होते, हा थरार सांगताना ऊर्मीचे डोळे पाणावले होते.
आजवर अनेक शिखरे चढलो. अनेक खडतर प्रवास दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वीपणे पार केले. मात्र निसर्गाचे हे रौद्ररूप पहिल्यांदाच पाहिले, अशी प्रतिक्रिया अश्विन यांनी कळविल्याचे ऊर्मी सांगत होती.
माझ्यासोबत आणखी ५०० जण धुंचेतल्या लष्करी छावणीत अडकून पडलेत. इथे नेटवर्क नाही. विजेअभावी मोबाइलची बॅटरी संपते आहे. आम्हाला भारतात नेण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, असा एसएमएस अश्विन यांनी केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने ‘लोकमत’ला दिली. अश्विन परत यावेत, अशी मागणी पोपट कुटुंब प्रशासनाकडे करीत आहे.

च्आम्ही डॅडींना सतत फोन करीत होतो, पण त्यांचा फोन लागत नव्हता. रवी, नमनचीही तीच स्थिती होती. जसजसा वेळ जात होता तसतशी घरातली अस्वस्थता आणखी वाढू लागली. फोन खणखणला, मोबाइलची रिंग वाजली, एसएमएस आला की वाटे डॅडींचा. आम्ही धावत जाऊन फोन उचले, तर तो दुसऱ्याचाच असे. आम्ही असंख्य एसएमएसही केले. त्यातले त्यांना काही मिळाले, काही अडकले. डॅडींकडून उत्तर मिळत नव्हते. आईचा धीर सुटू लागला.
च्याच दरम्यान डॅडींचा एसएमएस आला, क्या हुआ? हम यहा ठिक हंै... ते वाचून आम्ही आणखी गोंधळलो. बहुधा त्यांना भूकंपाची माहिती नव्हती. आम्ही त्यांना भूकंपाची कल्पना दिली. तिथल्या विनाशाची माहिती दिली आणि ट्रेकिंग तिथल्या तिथे थांबवून तत्काळ बेस कॅम्पला परतण्याचे आवाहन केले.
च्डॅडींचे काय झाले असेल, ते सुरक्षित असतील ना, या विचाराने पुन्हा काहूर
माजले. मात्र दुसऱ्या दिवशी डॅडींचा एसएमएस आला. ते धुंचे गावात लष्करी जवानांनी उभारलेल्या छावणीत होते़ हा थरार सांगताना ऊर्मीचे डोळे पाणावले होते. हे रौद्ररूप पहिल्यांदाच पाहिले, अशी प्रतिक्रिया अश्विन यांनी कळविल्याचे ऊर्मी सांगत होती.

Web Title: 72-year-old mountaineer stuck in Nepal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.