‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञातून दिवसभरात ७२३ युनिट रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:54+5:302021-07-05T04:05:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केवळ बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पुरविणारे माध्यम यांपुरते मर्यादित न राहता ‘लोकमत’ने सातत्याने लोकोपयोगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पुरविणारे माध्यम यांपुरते मर्यादित न राहता ‘लोकमत’ने सातत्याने लोकोपयोगी उपक्रम हाती घेत आपला समाजसेवेचा वसा कायम राखला आहे. राज्यभरात सध्या सुरू असलेला रक्तदानाचा महायज्ञ हाही त्याचाच एक भाग. ‘लोकमत’च्या या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रविवारी मुंबई आणि महानगर परिसरांतून तब्बल ७२३ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.
कोरोनाकाळात राज्यात ठिकठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ अखंड सुरू आहे. एरव्ही रविवारी सुटीच्या दिवशी आराम करणाऱ्या आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालविणाऱ्या मुंबईकरांनी ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाशी असलेले रक्ताचे नाते जपण्याचा प्रयत्न केला.
रविवार ४ जुलै रोजी बदलापूर, ठाणे, मुंब्रा, कल्याण, अंबरनाथ, पालघर, सानपाडा, कांजूरमार्ग, मानखुर्द, अंधेरी, वडाळा या मुंबई आणि महानगर परिसरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून मुंबईत ११२, पालघर ८६, नवी मुंबई ४८, तर ठाण्यात ४७७ असे मिळून एकूण ७२३ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.
.........
रविवारी झालेले रक्तसंकलन
मुंबईत – ११२
पालघर – ८६
नवी मुंबई – ४८
ठाणे – ४७७
एकूण – ७२३
........
नागरिकांना आवाहन...
रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. कोरोनासारख्या संकटकाळात भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करायची असल्यास हे माणुसकीचे नाते अतूट राहणे गरजेचे आहे. सध्या राज्यावर रक्तटंचाईचे संकट घोंगावत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात येत आहे.