आज प्रवेशाचा शेवटचा दिवस : ८ हजार १५३ विद्यार्थ्यांनीच केली प्रवेश निश्चिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी शुक्रवारी जाहीर करण्यात आली होती. या यादीत ७२ हजार ७३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. यापैकी केवळ ८ हजार १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश सोमवारी सायंकाळपर्यंत घेतले आहेत. तर मंगळवार या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीचा शेवटचा दिवस आहे.
राज्यभरात यंदा आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी १ लाख ३२ हजार ८४८ जागा आहेत. त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ७५२ आणि खासगी आयटीआयमध्ये ४० हजार ९६ जागा आहेत. या जागांवर आयटीआय प्रवेशासाठी पहिल्या यादीत २७ हजार २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यानंतर एसईबीसी आरक्षण वगळून प्रवेश घ्यावेत, असा निर्णय झाल्यानंतर दुसरी प्रवेशाची यादी जाहीर झाली होती. या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी असे सांगितले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पसंतीक्रमांच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही किंवा दुसऱ्या व तिसऱ्या यादीत प्रवेश न घेतलेल्यांना आता ११ डिसेंबर रोजी तिसऱ्या यादीत वाट पाहावी लागणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १५ डिसेंबर या काळात प्रवेश दिला जाणार आहे.
* अन्यथा पुढील प्रवेशात संधी नाही
विद्यार्थ्यांना पसंतीचे ट्रेंड मिळाले आहेत. विद्यार्थ्याने सादर केलेल्या प्रथम विकल्पानुसार या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश निश्चित झाल्यानंतरच त्याला पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल. अन्यथा तो ऑनलाइन प्रवेशातून बाद होईल. विकल्प निवडलेल्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचा या यादीत प्रवेश निश्चित झाला आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा अन्यथा पुढील प्रवेशात संधी मिळणार नाही.
-------------------------