मुंबई : कोरोनाचा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगासही बसला असून आता हळुवार का होईना हे क्षेत्र पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत आहे. देशभरातील ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग ते कोविड-१९च्या संकटात टिकून राहतील आणि पुन्हा उभारी घेतील, असा विश्वास आशिया लघु आणि मध्यम उद्योग २०२० या अहवालातून हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.१६०० लघु आणि मध्यम उद्योगांनी यासाठीच्या सर्वेक्षणात भाग घेतला. २६ मे ते ७ जून २०२० या काळात या सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक बाजारपेठेतील २०० सहभागींच्या मुलाखती घेण्यात आल्या. रिटेल/होलसेल, उत्पादन, प्रोफेशनल सर्व्हिसेस, हेल्थकेअर, शिक्षण आणि वित्त सेवा अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश होता.
जीडीपीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा सुमारे एक तृतियांश वाटा आहे. लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. आता बदलणाऱ्या व्यवसाय पद्धती आणि ग्राहकांच्या गरजांनुरूप बदल करण्याची क्षमता यामुळे ते फार कमी वेळात पुन्हा उभारी घेऊ शकतात. समारे ६४% लघु आणि मध्यम उद्योगांच्या मते या काळाने त्यांच्या व्यावसायिक धोरणांना नवे स्वरूप देण्याची एक चांगली संधी दिली आहे. ५० टक्के लघु आणि मध्यम उद्योगांच्या मते हे संकट दीर्घकाळात अधिक चांगल्या संधी आणणार आहे.
व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी डिजिटल मार्ग अवलंबण्याचे महत्त्व लघु आणि मध्यम उद्योगांना पटले आहे. ७५% लघु आणि मध्यम उद्योगांना विश्वास आहे की, त्यांच्या यशासाठी डिजिटल व्यवहारांचा अवलंब आवश्यक किंवा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान, मागील वर्षात ज्या लघु आणि मध्यम उद्योगांनी प्रगती केली त्यातील ५६ टक्के कंपन्यांना डिजिटल व्यवहारांनी चालना दिली. फक्त १४ टक्के लघु आणि मध्यम उद्योगांनी या मुद्द्याला कमी महत्त्व दिले.