आयआरडीए ॲपमध्ये राज्यातील ७३५८ अपघातांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:02 AM2021-07-13T04:02:02+5:302021-07-13T04:02:02+5:30
६ महिन्यांत सात हजार जणांना प्रशिक्षण : अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी होणार मदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारत सरकारचा ...
६ महिन्यांत सात हजार जणांना प्रशिक्षण : अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी होणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत सरकारचा एकात्मिक रस्ते अपघात डाटाबेस प्रकल्प म्हणजेच इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डाटाबेस (आयआरएडी) सर्व राज्यांत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात जानेवारी ते ९ जुलै २०२१ या जवळपास सव्वासहा महिन्यांच्या कालावधीत आयआरडीए ॲपमध्ये ७,३५८ अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत सात हजारांहून अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्याठिकाणी अपघात होईल त्याठिकाणची माहिती पोलीस, आरटीओ, आरोग्य आणि रस्ते महामार्ग प्रमुख यांच्याकडून इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डाटाबेस (आयआरएडी) या ॲपवर भरण्यात येते. हे सर्व कामकाज ऑनलाईन होत असल्याने अपघातस्थळावरील सर्व माहिती या ॲपद्वारे रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे असणार आहे. त्यावरून अहवाल तयार करून अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.
आयआरएडी या प्रकल्पामध्ये ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला आहे, तेथील दोन कर्मचारी व एक अधिकारी घटनास्थळी दाखल होतील. त्यानंतर अपघाताचे छायाचित्र, व्हिडीओ दिलेल्या ॲपवर अपलोड केला जाईल. याचप्रकारे इतर माहिती आरोग्य, आरटीओ व महामार्ग अधिकारी भरणार आहेत. यात अपघात का झाला, कारण काय होते, अशा स्वरूपाचे सर्व विश्लेषण केले जाणार आहे.
राज्यातील आयआरडीए ॲपसाठीचे कामकाज
विभाग - ४९
अपघात नोंद - ७३५८
प्रशिक्षण सत्र - ८८२
प्रशिक्षण सहभाग - ७१०६
पोलीस स्थानक सहभाग - ११३५पैकी ११००
पोलीस स्थानक प्रमुख - ११५७
पोलीस अधिकारी - ७५५७
मोटार वाहन निरीक्षक - ४५४
अपघात रोखण्यासाठी मदत
रस्ते अपघात रोखण्यासाठी भारत सरकारच्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या ॲपमुळे अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून देण्यात आली.