मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालानद्वारे दंड पोलिस आकारात आहेत; मात्र वाहनचालकांनी असा दंड भरण्याकडे पाठ फिरविली आहे. मुंबईत थकीत ई-चालानचा आकडा ७३९ कोटी झाला आहे. २० हजारांहून अधिक ई-चालान थकीत असून त्यांनी तातडीने दंड भरावा अन्यथा न्यायालयाची पायरी चढावी लागेल, असा इशारा वाहनचालकांना देण्यात आला आहे. चुकीच्या दिशेने वाहतूक, अनधिकृत पार्किंग, विनाकारण हॉर्न, विनाहेल्मेट, तसेच सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीमुळे मुंबईत कारवाईचा वेग वाढला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यानं ई-चालान जनरेट व्हायला लागल्यापासून अनेकजण नियम तोडूनही पैसे भरत नाहीत. काही जणांच्या नावावर एकापेक्षा जास्त गाड्या असतात, त्यातल्या काही गाड्यांवर सतत नियम तोडल्यामुळे दंडाची मोठी रक्कम भरायची बाकी असते. ज्यांनी वारंवार मेसेज पाठवूनही ई-चालानची मोठी रक्कम भरली नाही, अशा डिफॉल्टर्सना नोटीस पाठविली जाते.
- थकीत ई-चालानबाबत दर तीन महिन्यांनी लोकअदालत भरवली जाते. यात अनेकजण त्यांचा दंड भरतात. - ई-चालान हे गाडीच्या रजिस्ट्रेशनवेळी देण्यात आलेल्या मोबाइल नंबरवर पाठविले जाते, पण अनेक ग्राहकांचे मोबाइल नंबर नंतर बदलतात, ते अपडेट होत नाहीत, पर्यायाने त्यांना त्यांच्या गाडीवर जनरेट झालेले ई-चालान मिळत नाही, याचा अनेकजण गैरफायदाही घेतात. - अनेक नागरिक जनरेट झालेल्या ई-चालानला आव्हान देतात, चुकीच्या पद्धतीने ई-चालान जनरेट झाल्याचे सांगत पैसे देण्याचं टाळतात, त्यांना आम्ही न्यायालयात जाण्याचा मार्ग सुचवतो, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
एक हजारपेक्षा जास्त जणांनी थकवला ५० हजार दंडएकीकडे २० हजारहून अधिक ई-चालान आहे, त्यांच्यावर कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे; मात्र एक हजारहून अधिक वाहनचालक आहेत त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त दंड थकविला आहे.