केंद्रीय आराेग्य विभागाची माहिती; राज्यात दोन आठवड्यात काेराेना पॉझिटिव्हचे प्रमाण दुप्पट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीयस्तरावर विचार केला असता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात दोन आठवड्यात पॉझिटिव्हचे प्रमाण दुप्पट झाले आहे. सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असून आरोग्य विभागासह स्थानिक पातळीवर प्रशासन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पॉझिटिव्ह दर ४.७ टक्के इतका होता, मात्र ८ ते २१ कालावधीत ७.७ टक्के इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देशातील ७४ टक्के सक्रिय रुग्ण केरळसह महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रात साप्ताहिक पॉझिटिव्हचे प्रमाण ८.१० टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यानंतर केरळचा पॉझिटिव्ह दर हा ७.९० टक्के तर आंध्रप्रदेशचा ३.३० टक्के आहे. देशातील ७४ टक्के सक्रिय रुग्णांचा समावेश केरळ आणि महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. राज्यात आठवड्यात वाढत असलेल्या रुग्णांचे प्रमाण नागपूरमध्ये ३८, अमरावती ३३ टक्के, नाशिक ४७ टक्के, अकोल्यात ५५ टक्के आणि यवतमाळमध्ये ५५ टक्के इतके असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
...............................