Join us

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ७४ कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:05 AM

लाॅकडाऊनच्या काळातील कामगिरी : १९ हजार ४६२ आरोपींना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील ...

लाॅकडाऊनच्या काळातील कामगिरी : १९ हजार ४६२ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील नऊ महिन्यांत केलेल्या विविध कारवायांत ३२ हजार २३८ गुन्हे नोंदविले असून १९ हजार ४६२ आरोपींना अटक केली. याशिवाय, ७४ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन हजार ६६३ वाहने ताब्यात घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल ते २२ डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीतील कारवायांची माहिती देताना आयुक्त उमाप म्हणाले की, हातभट्टीवरील दारूची निर्मिती आणि विक्रीचे १८,७८६ गुन्हे नोंदविण्यात आले. या प्रकरणात ७,०२८ आरोपींना अटक करण्यात आली असून ३४ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अवैधपणे परराज्यांतील मद्यविक्रीचे एकूण ७६५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६५६ आरोपींना अटक करण्यात आली. १३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

मद्याच्या अवैध वाहतुकीचे १८२ गुन्हे नोंदविले असून २१४ आरोपींना अटक करण्यात आली. चार कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच बनावट मद्यविक्रीचे ७१ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७९ आरोपींना अटक झाली. या प्रकरणात दोन कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

* येथे करता येईल तक्रार

हातभट्टी, परराज्यांतील अवैध मद्य, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरुद्ध तक्रारी करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू आहे. यासंदर्भात तक्रारीसाठी १८००८३३३३३३ हा टोल फ्री क्रमांक कार्यरत आहे. तसेच ८४२२००११३३ या व्हाॅट्सॲप क्रमांकावरही तक्रार करता येईल.

..................................