मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती संपली असून आता आणखी एक अंतिम संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. आतापर्यंत राज्यात ८५,३८१ म्हणजे ७४ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत.राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४७७ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. नियमित प्रवेश फेरीत ६८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रतीक्षा फेरीत आतापर्यंत १७ हजार १७१ प्रवेश देण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे बहुतांश विद्यार्थी स्थलांतरित झाले असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड होऊनही त्यांचे प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यांचे नुकसान होऊ नये यासठी आता त्यांना अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.यंदाची आरटीई प्रवेशाच्या जागा भरण्याची आकडेवारी चांगली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी असून त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया टेमकर यांनी दिली.
प्रवेशाची राज्यातील आकडेवारी- ९,३३१ - जागा रिक्त असलेल्या शाळा- १,१५,४७७ - एकूण राखीव जागा- २,९१,३६८ - रिक्त जागांसाठी आलेले अर्ज