अपंगात्वर मात करून अनुष्काने कॉमर्समध्ये मिळविले ७४ टक्के
By Admin | Published: June 1, 2017 04:38 AM2017-06-01T04:38:17+5:302017-06-01T04:38:17+5:30
शरीर साथ देत नसतानांही आणि आर्थिक स्थिती बेताची असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या दोन फूट उंचीच्या अनुष्का उत्तम नाईक या
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : शरीर साथ देत नसतानांही आणि आर्थिक स्थिती बेताची असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या दोन फूट उंचीच्या अनुष्का उत्तम नाईक या विद्याथीर्नीने बारावीच्या परिक्षेत कॉमर्स शाखेतून ७४ टक्के गुण मिळवून उंच भरारी घेतली आहे.
उंची अवघी दोन फुटाची पण कर्तृत्व मात्र उंचच उंच वाढत जाणारे असे अनुष्काने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. आगाशी वटार येथील दत्त मंदिर येथे राहणाऱ्या अनुष्काने जन्मजातच शारिरिक व्यंग असूनही इच्छाशक्तीच्या जोरावर संकटांवर मात करीत इर्षेने अभ्यास करून बारावीच्या परिक्षेत तब्बल ७४ टक्के गुण मिळवून यश मिळवले. नंदाखाल येथील सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेजमध्ये अनुष्का शिक्षण घेत आहे. तिला कॉमर्स पदवीधर व्हायचे असून याच शाखेतील उच्च शिक्षण शिक्षणही तिला घ्यायचे आहे.
सामवेदी ब्राम्हण संघाचे अध्यक्ष बबनशेठ नाईक, उपाध्यक्ष वसंत पाटील, पिपल्स सोसायटीचे अध्यक्ष मनोहर पाटील, वसई जनता बँकेचे संचालक जयवंत नाईक, जैमुनी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत नाईक यांनी घरी जाऊन अनुष्काचे कौतुक केले. सामवेदी ब्राम्हण समाजाचे नाव अनुष्काने उंचावले आहे. पुढच्या शिक्षणासाठी समाज तिच्या पाठीशी असून तिला कशाचीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही बबनशेठ नाईक यांनी तिचे अभिनंदन करतांना तिला दिली.