लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त मुलुंडमध्ये शुक्रवारी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात मुलुंडच्या ७४ वर्षीय आजोबांनी रक्तदानासाठी हट्ट धरला होता. वयोमानामुळे त्यांना रक्तदान करणे शक्य नव्हते. त्यांच्या नातवाने रक्तदानाचा हक्क बजावला.
मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीतील कुस्तीगीर खाशाबा जाधव गार्डन येथे लोकमत आणि म्हाडा कॉलनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, रोटरी क्लब ऑफ मुंबई, मुलुंड पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
म्हाडा कॉलनी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवि नाईक यांच्या हस्ते याचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जे.जे. महानगर रक्तपेढीचे अजय भिसे, रक्तदाते भवरलाल गेहलोत, राजकुमार जैन उपस्थित होते.
करण रेवर या तरुणाने सकाळी रक्तदानाचा हक्क बजावला. कोरोनाच्या काळात हे त्याचे पाचवे रक्तदान होते. करण सांगतो, सकाळी लोकमतच्या रक्तदान शिबिरात जात असल्याचे सांगताच त्याचे ७३ वर्षीय आजोबा त्रिकाम जी. कोळी यांनी सोबत येण्यासाठी हट्ट धरला. फक्त वयोमानामुळे त्यांना रक्तदान करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी असा उत्साह दाखवत असतील तर आपण का मागे राहायचे. सध्या कोरोनाच्या काळात सर्वांनीच रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्याने नमूद केले.
यावेळी मुलुंड भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे पर्यावरण सेल अध्यक्ष संजय शिंगरे, मुंबई कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य कैलास पाटील, म्हाडा कॉलनी फेडरेशनचे सचिव पुष्कराज माळकर आणि मंडळाचे कार्यकर्ते संजय पाठक, प्रकाश राणे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. यात अनेकजण लसीकरणामुळे पात्र ठरले नाही तर महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना माघारी जावे लागले. यात, एकूण १४ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला आहे.
......