Mumbai: 'लिफ्ट'ने पुन्हा घेतला एकाचा जीव, मालाडमधील शिक्षिकेनंतर आता बोरिवलीत वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:53 PM2022-10-12T14:53:06+5:302022-10-12T14:53:37+5:30
मुंबईत लिफ्टमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
मुंबई: मुंबईत लिफ्टमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. शहरातील बोरिवली भागातील एका हाउसिंग कॉलनीत लिफ्टच्या अपघातात जखमी झालेल्या 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पीडित वृद्धावर मागील काही दिवसांपासून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मुंबईतील बोरिवली भागातील रहिवासी आहेत. 2 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले होते.
कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन पाटील पहिल्या मजल्यावरील लिफ्टमध्ये शिरले असता लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने लिफ्ट खाली जाऊ लागली आणि अचानक जमिनीवर आदळली. या अपघातात पाटील यांच्या हाताला, छातीला आणि खांद्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. ही घटना घडताच वृद्ध व्यक्तीला तुळजाई सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
शिक्षिकेचाही झाला होता मृत्यू
कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही अपघात मृत्यू अहवाल (ADR) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि अपघात काही निष्काळजीपणामुळे झाला की नाही हे याचा तपास सुरू आहे." खरं तर मागील महिन्यात बोरीवलीच्या जवळच असलेल्या मालाड मध्ये देखील लिफ्टच्या अपघातात एका शिक्षिकेने आपला जीव गमावला होता. या घटनेने शाळेतील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही हादरवून सोडले होते.