Join us

जुलै महिन्यात मलेरियाचे ७४८ रुग्ण

By admin | Published: August 03, 2015 2:54 AM

जुलै महिन्यात मुंबईत पाऊस कमी झालेला असला तरीही बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांना अजूनही आजारांनी घेरलेले आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या

मुंबई : जुलै महिन्यात मुंबईत पाऊस कमी झालेला असला तरीही बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांना अजूनही आजारांनी घेरलेले आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा संसर्ग वाढला असून, जुलै महिन्यात मलेरियाचे तब्बल ७४८ रुग्ण आढळले आहेत. आॅगस्टमध्ये सर्वसाधारण सरासरीप्रमाणे पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.जुलै महिन्यात मुंबईकरांना ताप भरला होता. ७ हजार ९२२ तापाचे रुग्ण आढळून आले. सर्दी, खोकला, घसा खवखवणे असा त्रास अनेकांना जाणवतो. पण त्यावर औषध न घेतल्यास त्रास वाढून ताप येतो. यामुळे प्राथमिक लक्षणे आढळल्यावर त्वरित औषधोपचार करण्याची गरज असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराच्या बरोबरीनेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण मुंबईत वाढलेले आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे १ हजार ७५५ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या कमी आहे. पण पाऊस कमी झाला असूनही रुग्णांची संख्या इतकी असल्यामुळे मुंबईकरांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मुंबईकरांनी पाणी उकळून, गाळून प्यावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत. हॅपिटायटिसचे (ए, ई) १०६ रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारात मलेरियाचे रुग्ण जास्त आढळून आले आहेत. मलेरियाचे ७४८ रुग्ण आढळून आले आहेत, तर डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. लेप्टोचे ७८ रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइनच्या रुग्णांचा आलेख जुलैमध्ये चढताच राहिलेला आहे. २०१३ आणि २०१४ च्या जुलै महिन्यांत स्वाईनच्या रुग्णांची संख्या १, २ इतकी होती. पण, यंदा जुलैमध्ये स्वाइनचे तब्बल १८४ रुग्ण आढळून आले. (प्रतिनिधी)