Join us

शुक्रवारीही एअर इंडीयाची ७५ विमाने रद्द; स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार

By मनोज गडनीस | Published: May 10, 2024 6:15 PM

विमान उड्डाणाची स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. 

मनोज गडनीस, मुंबई:एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सायंकाळी संपला असला तरी कंपनीच्या विमानांचे वेळापत्रक अद्यापही सुस्थितीत आलेले नाही. परिणामी, शुक्रवारी कंपनीच्या ७५ विमानांचे उड्डाण रद्द झाले. विमान उड्डाणाची स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. 

मंगळवार सांयकाळपासून अचानक आजारी पडल्याचे कारण सांगत कंपनीचे वैमानिक आणि केबिन कर्मचारी अशा एकूण ३०० कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेचे आंदोलन केले होते. त्यानंतर गुरुवार सायंकाळपर्यंत कंपनीच्या एकूण १७० विमानांचे उड्डाण रद्द झाले. गुरुवारी सायंकाळी संप संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरीही वेळापत्रक अद्यापही कोलमडलेले आहे. शनिवारी देखील कंपनीच्या किमान ४५ ते ५० विमानांचे उड्डाण रद्द होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कंपनीची विमान सेवा रद्द झाल्यानंतर त्याचा मोठा फटका कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला होता. मात्र, ज्या प्रवाशांचे विमान रद्द झाले अशा प्रवाशांना तिकीटाचा १०० टक्के परतावा देण्याची घोषणा कंपनीने केली होती. त्यानुसार या परताव्यापोटी कंपनीला अंदाजे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे.

टॅग्स :एअर इंडिया