मुंबई : कचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर ज्या ठिकाणी ठेवले जातात अशा ठिकाणी महापालिकेने सफाई चौक्या उभारल्या आहेत. या ७५ चौक्यांची डागडुजी केली जाणार आहे. या चौक्यांच्या ठिकाणी कचरा वाहून नेणारे ११२ कॉम्पॅक्टर ठेवले जातात.
मुंबईतील ज्या ठिकाणी जास्त कचरा जमा होतो त्याठिकाणी कचरा जमा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने कॉम्पॅक्टरचा वापर केला जातो. कॉम्पॅक्टरमध्ये हा कचरा भरून नंतर डम्पिंग ग्राउंडवर नेला जातो. या कॉम्पॅक्टरमधेच कचरा भरला जावा तसेच खाली पडलेला कचरा उचलला जावा यासाठी कामगार नेमण्यात आले असून या कामगारांकरिता चौक्या उभारण्यात आल्या आहेत. शहर भागात ५१ कॉम्पॅक्टर आणि ३३ चौक्या, पूर्व उपनगरात ४० कॉम्पॅक्टर आणि ३० चौक्या तर पश्चिम उपनगरात २१ कॉम्पॅक्टर आणि १२ चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अलीकडच्या काळात या चौक्यांची दुरवस्था झाली आहे.
चौक्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी देण्यात आलेले कंत्राट संपल्याने एक वर्षांसाठी नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. शहर भागासाठी एस.एम. ट्रान्सपोर्ट, पूर्व उपनगरांची एशियन टट्रेडर्स आणि पश्चिम उपनगरांची लक्ष इंटरप्रायझेस या कंपनीचे निवड करण्यात आली आहे. शहर भागासाठी ८ कोटी ९ लक्ष १३ हजार, पश्चिम उपनगरांची ७ कोटी ६० लाख ९४ हार आणि पूर्व उपनगरांची ३ कोटी २६ लाख ८२ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.