नाट्यगृहांच्या दरात ७५ टक्के सवलत; नाट्यनिर्मात्यांना महापालिकेचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 08:16 PM2020-12-17T20:16:47+5:302020-12-17T20:17:33+5:30
कोविड काळात बंद असलेली नाट्यगृह नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने नाट्यप्रयोग बंद असल्याने बहुतांशी निर्मत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या नाट्यगृहांचे भाडे ७५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक खेळासाठी चारशे रुपये तिकीट दरापर्यंत पाच हजार रुपये भाडे ३१ मार्च २०२१ पर्यंत अथवा ५० टक्के आसन क्षमतेबाबतचा निर्णय रद्द होईपर्यंत आकारण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी दिली.
कोविड काळात बंद असलेली नाट्यगृह नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. मात्र, नाट्यगृहाच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहाण्याची परवानगी आहे. कोविड काळात झालेली आर्थिक कोंडी आणि प्रेक्षकांची कमी उपस्थितीमुळे निर्मात्यांना नाटकाचे प्रयोग करणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याची मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौरांकडे केली होती.
बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे, विलेपार्ले - दिनानाथ मंगेशकर आणि मुलूंड येथे महाकवी कालीदास अशी पालिकेची तीन नाट्यगृह आहेत. या नाट्यगृहांच्या भाड्यात ७५ टक्के कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र नाट्यनिर्मात्यांना भाड्यात सवलत देताना पालिकेने बालनाट्यांच्या प्रयोगावर बंदी आणली आहे. तसेच आसन क्षमतेच्या निम्म्या प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी व मास्क वापरणेही बंधनकारक असेल.
सवलतीचे दर-
मराठी नाटक वाद्यवृंद - विद्यमान....सवलतीचे दर
१९ हजार ८५० (वस्तू व सेवा कर वगळून ) ... पाच हजार रुपये (वस्तू व सेवा कर वगळून )
अमराठी नाटक आणि वाद्यवृंद - ३९ हजार ६९० (वस्तू व सेवा कर वगळून ) ..... दहा हजार रुपये (वस्तू व सेवा कर वगळून )
बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील लघुनाट्यगृहाच्या भाड्यातही कपात करण्यात आली आहे. मराठी नाटक आणि वाद्यवृंदासाठी तीन हजार आणि अमराठी नाटक, वाद्यवृंदासाठी सहा हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. मात्र,तिकीट दर दीडशे रुपयांपर्यंत ठेवणे बंधनकारक आहे.