मुंबई विमानतळावर ७५ किलो चंदन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 06:24 AM2019-08-14T06:24:03+5:302019-08-14T06:25:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एका सुदानी नागरिकाकडून ७५ किलो चंदन जप्त करण्यात आले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एका सुदानी नागरिकाकडून ७५ किलो चंदन जप्त करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने टर्मिनल २ वर ही कारवाई केली. बक्री अब्बास हुसैन सय्यद या प्रवाशाने आपल्या बॅगांमधून हे चंदन लपवून आणले होते.
इथिओपिया एअरलाइन्सच्या ईटी-६४१ विमानाने तो अदीस अबाबा येथे जाणार होता. त्याच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर त्यात संशयास्पद वस्तू आढळल्या. सीआयएसएफच्या तपासणीत त्याने बॅगांमध्ये चंदन लपविल्याचे समोर आले. त्याच्याकडे ७५ किलो चंदन घेऊन जाण्याचा अधिकृत परवाना नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
सीआयएसएफने तत्काळ विमानतळावरील सीमाशुल्क विभाग व महाराष्ट्र वन विभाग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या ७५ किलो चंदनाची किंमत ४ लाख ९० हजार रुपये आहे. चंदनासहित या आरोपीला सीआयएसएफने पुढील कायदेशीर कारवाईसाठी महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.