मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला ठगाला सुरतमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. परेशकुमार पटेल आरोपीचे नाव असून, गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
आरोपी पटेलने तक्रारदार तसेच नऊजणांची खोडीयार महादेव ग्रो.प्रा.लि. व वेजफ्रूट मार्ट कंपनी मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ७४ लाख ७० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान आरोपी पटेल गुजरातमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली. पटेलने गुजरातमध्येदेखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासादरम्यान समोर आले. पोलिस शोध घेत असल्याचे समजताच तो सतत ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचण येत होती.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ४ कडे वर्ग करण्यात आला. तपास सुरू असताना आरोपी पटेल सूरतमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कक्ष ४चे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सुरतला रवाना झाले. तेथे सापळा लावून आरोपी परेशकुमार पटेल याच्या मुसक्या आवळल्या.
१० हजारांना लुबाडले, हातात ठेवले कपटे बोरीवलीत सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने चिराग वानिया (२४) याला गुरूवारी १० हजार रुपयांना लुबाडण्यात आले. याप्रकरणी त्याने बोरिवली पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानिया हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला आहेत. त्यांच्या मालकाने धनादेश देत तो विड्रॉल करून आणायला सांगितला. चेक वटल्यानंतर एकाने सुट्टे पैसे पाहिजेत असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत पैसे दिले. त्याने कागदाचे कपटे देत हातात ठेवत तो पसार झाला.