Join us

आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:08 AM

राज्यातील ३०० आदर्श शाळांच्या निकषाचा मसुदा जाहीरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ३०० आदर्श शाळांच्या निकषाचा मसुदा जाहीर ...

राज्यातील ३०० आदर्श शाळांच्या निकषाचा मसुदा जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ३०० आदर्श शाळांच्या निकषाचा मसुदा जाहीर झाला आहे. त्यानुसार, शालेय इमारतीत संपूर्ण योजनेचे सोलर युनिट असणे आवश्यक आहे. शाळेत पाचवीचा वर्ग असल्यास त्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे, तसेच पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पातळीच्या त्रयस्थ मूल्यांकनात सर्व मुलांना ७५ टक्के गुण मिळाल्यास आदर्श शाळेसाठी अर्ज करणाऱ्या शाळेची निवड राज्यातील ३०० आदर्श शाळांमध्ये होणार आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दरम्यान, या शाळांच्या निवडीसाठी निकष जाहीर करण्यात आले आहेत, त्यामध्ये वरील काही निकषांचा समावेश आहे.

आदर्श शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. ही योजना पायाभूत, भौतिक व शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्तेचे संवर्धन, परवडणारे शिक्षण, समाज/पालक/ व मुख्याध्यापक यांचे सहकार्य या पाच मुख्य क्षेत्रांवर आधारित असेल. या योजनेच्या निकषांमध्ये शाळा सिद्धी व स्वच्छ शाळा प्रकल्पामध्ये उल्लेख केलेल्या सर्व भौतिक सुविधा असणे अपेक्षित आहे. तसेच शाळेत वाय फाय, पटसंख्या प्रमाणात शिक्षक, चाईल्ड फ्रेंडली व इको फ्रेंडली अशी शाळेची इमारत, प्रथमोपचार पेटी, रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा, प्रकाश व सभागृह व्यवस्था, अंगणवाडी, बालवाडी वर्ग आणि वाहतूक व्यवस्था आदी सुविधांचा समावेश असणे निकषांमध्ये अपेक्षित आहे.

शाळा विकास आराखड्यानुसार अपेक्षित खर्चाच्या २० टक्के निधी शाळेने लोकसहभागातून, तर उर्वरित ८० टक्के निधी उपलब्धता शासनाने करणे अपेक्षित आहे. तसेच या मसुद्यानुसार शाळेची एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृती मुख्याध्यापकांनी निर्माण करणे, मुख्याध्यापकांनी शालेय नेतृत्त्व व व्यवस्थापन याचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे. या योजनेतून शिक्षकांना बदली प्रक्रियेमधून स्थैर्य मिळावे हा उद्देश असणार असल्याचेही मसुद्यात नमूद आहे.

* मूलभूत संकल्पना शिकवण्यावर भर

विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना शिकविल्या जाणार असून, ग्रंथालयांमध्ये पूरक शिक्षण देणारी पुस्तके, विश्वकोष या योजनेतून उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांचे कौशल्यही शिकविले जाण्याचा उद्देश यात नमूद करण्यात आला आहे.

...........................