पावसाचे पाणी तुंबणाऱ्या ७५ नवीन ठिकाणांचा शोध, मुंबई पूरमुक्त करण्याचे दावे वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:13 AM2019-07-05T03:13:48+5:302019-07-05T03:14:01+5:30
स्थानिक नागरिकांनी सोमवारी केलेल्या तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
मुंबई : आतापर्यंतच्या दुस-या क्रमांकाच्या सर्वाधिक पावसामुळे मुंबईत पाणी तुंबल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची तब्बल ७५ नवीन ठिकाणं आढळून आली आहेत. स्थानिक नागरिकांनी सोमवारी केलेल्या तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पूरमुक्त करण्याचे पालिकेचे दावे यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले आहेत.
२०१७ मध्ये मुंबईत तब्बल २२५ ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आले होते. याच वर्षी आॅगस्ट महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसात पोटविकार तज्ज्ञ दीपक आमरापूरकर मॅनहोलमध्ये वाहून गेले होते. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पालिका प्रशासनाने पाणी तुंबण्याची ठिकाणं कमी करण्यावर भर दिला होता. तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागातील पाणी तुंबणाºया ठिकाणांचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते.
गेल्या वर्षी पाणी तुंबणारी ४८ नवीन ठिकाणं आढळून आली. दोनशे ठिकाणी पाणी तुंबू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र विविध अडचणींमुळे कामं अर्धवट राहिलेल्या ७० ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचा धोका कायम असल्याचे दिसून आले. तर पूर्वी कधीही पाणी न भरलेल्या ७५ नवीन ठिकाणी पाणी भरल्याचे आढळून आले. पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले़
अशा आहेत अडचणी
किंग्ज सर्कल येथे नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. परंतु, त्या ठिकाणाहून मोठी जलवाहिनी जात असल्याने कोणतेही बदल करणे शक्य होत नाही. तसेच मोगरा नाला छोटा असल्याने मुसळधार पावसात त्यातून पाणी त्याच क्षमतेने वाहून जाऊ शकत नाही. अंधेरी सबवे येथे या नाल्याची रुंदी जागेअभावी कमी असल्याने अडचण वाढते. स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे येथील उपाययोजना रखडली.
पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे
कुलाबा मार्केट लाल निगम रोड, ताडदेव बस आगार, महाराष्ट्र नेचर पार्क धारावी, जुने प्रभादेवी रोड, दादर अनुग्रह हॉटेल. अंधेरी पूर्व येथील जिजामाता रोड, मार्वे रोड, टोलानी पोलीस चौकीजवळ, जेव्हीपीडी विलेपार्ले, वकोला गाव, दिंडोशी बस आगार, आरे रोड येथील काही भाग. बर्वे नगर, ओएनजीसी, छेडा नगर जंक्शन घाटकोपर, विक्रोळी पार्क साईट, भीम नगर मानखुर्द, एलबीएस मार्ग घाटकोपर, कुर्ला न्यू मिल रोड.
खार सबवे, मिलन आणि मालाड सबवेही समुद्र सपाटीपेक्षा खाली असल्याने तेथे पाणी तुंबते. त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात येतात. मात्र मुसळधार पावसात येथे पाण्याची पातळी झपाट्याने वाढते आणि पंप काम करीत नाहीत.
पाणी तुंबण्याची नवीन स्थळं तात्पुरती असून स्थानिक स्वरूपातील आहेत. त्याची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच काही भाग सखल आहेत. या ठिकाणांचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्यात येईल, असे पर्जन्य वाहिन्यात खात्यातील अधिकाºयाने सांगितले.