७५ टक्के मुंबईकर आरोग्याविषयी अनभिज्ञ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:49 AM2018-04-07T06:49:37+5:302018-04-07T06:49:37+5:30
नियमित आरोग्य तपासणी केल्यास, एखादा आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच समजू शकतो. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर वार्षिक आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीला आरोग्याची काहीच तक्रार नसेल, तर ती व्यक्ती डॉक्टरकडे जात नाही.
मुंबई - नियमित आरोग्य तपासणी केल्यास, एखादा आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच समजू शकतो. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर वार्षिक आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीला आरोग्याची काहीच तक्रार नसेल, तर ती व्यक्ती डॉक्टरकडे जात नाही. पण प्रत्येक विकाराची लक्षणे जाणवतील किंवा दृश्य स्वरूपात दिसतीलच असे नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, जवळपास ७५ टक्के मुंबईकर आपल्या आरोग्याविषयी अनभिज्ञ आहेत.
यंदा जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘युनिव्हर्सल हेल्थ’ अशी आहे. या अंतर्गत सर्व पातळ्यांवर समाजाच्या तळागाळातील घटकांना आरोग्यसेवा पुरविणे हेच ध्येय आहे. मात्र, अशा परिस्थितीत प्रत्येक खासगी-शासकीय यंत्रणांनी आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याविषयी अधिक जागरूक झाले पाहिजे, असे मत डॉ. परीक्षित शाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांपासून प्रत्येकाचेच जीवनमान गतीने बदलते आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आहारावर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आहे. परिणामी, विविध वयोगटात प्रत्येकाला वेगवेगळ्या आजारांनी घेरले आहे. त्यात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब, नैराश्य अशा विविध आजारांचे प्रमाण वाढते आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्वत:च्या निरोगी आयुष्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,
असे मत डॉ. शैलेश हिरवे यांनी व्यक्त केले.
आरोग्याच्या सजगतेविषयी बोलताना हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राम सक्सेना यांनी सांगितले, महिलांमध्ये हृदयविकारासंदर्भात असणाऱ्या अनास्थेबद्दल वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. एकूणच आरोग्याविषयी महिलांमध्ये फारशी सजगता नसते. त्यात हृदयविकाराचा धोका हा पुरुषांइतकाच महिलांमध्येही वाढता असला तरीही त्याकडे महिला गांभीर्याने पाहत नाहीत, असा अनुभव आहे.
प्रौढांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविणे ही जागतिक आरोग्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन तिला प्रतिसाद म्हणून ‘द व्हॅक्सिनेशन फॉर लाइफ’ ही मोहीम आखण्यात आली होती. लसीकरण ही सार्वजनिक आरोग्य सेवाक्षेत्राकडून राबविण्यात येणाºया उपाययोजनांपैकी सर्वांत किफायतशीर उपाययोजना असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. अशा योजना राबविण्यावरही भर दिला पाहिजे, असे मत डॉ. शफी शेख यांनी मांडले.
संवाद साधा : तुमच्या मनात निर्माण होणाºया कोणत्याही भावनांविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बोला. जेणेकरून तुमच्या भावनांना मोकळी वाट मिळेल. तुम्हाला अस्वस्थ, उदासीन वाटत असेल अशा वेळी काही गोष्टी काळावर सोडून द्या. कारण काळ हे एक उत्तम औषध असते. आपली तब्येत उत्तम होण्यासाठी किंवा आपल्याकडून काहीतरी चांगलं होण्यासाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो.
सकस अन्न खा
कॅफीन आणि साखर यांचा शरीरावर त्वरित परिणाम होत असतो. म्हणूनच आपण दररोज जे अन्न सेवन करतो त्याचादेखील नकळतपणे आपल्या शरीरावर परिणाम होत असतोच. हा परिणाम दीर्घकाळ टिकतो. म्हणूनच नेहमी चांगले सकस अन्न सेवन करावे
कामातून ब्रेक घ्या
कामात किंवा ठिकाणात बदल हा मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतो. मग तो ब्रेक अगदी पाच मिनिटांचा का असेना, घरकामातून पाच मिनिटे शांत बसा. आॅफिसमध्ये काम करत असाल तर अर्ध्या तासाचा लंच ब्रेक घ्या.
शनिवार-रविवार कुठेतरी फिरायला जाणं हा अतिशय चांगला ब्रेक ठरू शकतो. ज्यामुळे काम करायला उत्साह येतो. काही मिनिटं जरी आपण वेगळं व आवडीचं काम केलं तर तणाव काहीसा कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला उत्साह वाटतो.
व्यसनांना दूर ठेवा : आपल्याला चांगलं वाटावं किंवा आपला मूड बदलावा म्हणून कित्येक जण व्यसनांच्या आहारी जातात. काही जण तर त्यांचा एकाकीपणा आणि भीती यापासून दूर राहण्यासाठी अवाजवी नशा करतात, पण नशा किंवा इतर व्यसनांमधून मिळणारा दिलासा हा तात्पुरताच असतो.