गणपतीसाठी एसटीच्या ७५ टक्के बस फुल्ल; जादा गाड्या कधीपासून सोडणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 08:59 AM2024-08-25T08:59:32+5:302024-08-25T08:59:59+5:30
प्रवाशांची वाढती मागणी पाहता, मागील वर्षापेक्षा यंदा जादा गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क : एसटी महामंडळाने मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या ४३०० अतिरिक्त गाड्यांपैकी ७५ टक्के बसेस १० दिवस आधीच फुल्ल झाल्याचे समोर आले आहेत. या बसचे बुकिंग २६ जुलै रोजी सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे ३१९६ गाड्यांचे आरक्षण झाले असून, त्यात २४३९ ग्रुप बुकिंगचा समावेश आहे.
महामुंबईतून लाखोंच्या संख्येने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षी नियमित बसेस व्यतिरिक्त अतिरिक्त गाड्यांची सोय एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती मागणी पाहता, मागील वर्षापेक्षा यंदा जादा गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोकणात जाणाऱ्या या बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागातून २ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत.
दि. ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यांवर एसटीचे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक, प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
- डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ