मुंबईच्या समुद्रात ७५ टक्के प्लास्टीक; पाच किमीपर्यंत मासे नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:47 AM2020-03-08T01:47:30+5:302020-03-08T01:48:39+5:30
बाटल्या, पिशव्यांचा खच
सचिन लुंगसे
मुंबई : जगभरात दर मिनिटाला १० लाख प्लास्टीकच्या बॉटल खरेदी केल्या जातात. एक वर्षाला ५ खरब प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. प्रत्येक वर्षी ८० लाख टन एवढा प्लास्टीकचा कचरा महासागरात टाकला जातो. मुंबईच्या समुद्रात दररोज जमा होत असलेल्या कचऱ्यापैकी ७५ टक्के प्लास्टीकचा आहे. यात बाटल्या, पिशव्यांचा समावेश आहे. परिणामी, मुंबईच्या समुद्रात प्लास्टीकचा डम्पिंग ग्राउंड तयार झाला असून, समुद्रात पाच किलोमीटरपर्यंत मासेच आढळत नाहीत.
मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले की, गेल्या ७० वर्षांत मुंबईचा समुद्रकिनारा डम्पिंग ग्राउंड बनला आहे. मासेमारी करण्यासाठी १ ते ५ किलोमीटर आत समुद्रात जावे लागते. तरीही मासे जाळ्यात सापडत नाहीत. जाळ्यामध्ये पॉलिथिन बॅग येतात. समुद्र प्रदूषित झाल्याने मासे प्रजननासाठी किनारी येत नाहीत. शिवडी, माहुलसारख्या समुद्रकिनारी लोक राहण्यास तयार नाहीत. माहिमच्या खाडीलगतहून लोकल जाते, तेव्हा उग्र वास येतो. सत्तर वर्षांत एकदाही समुद्रातला गाळ काढलेला नाही.
दररोज समुद्रात मुंबईचा १८ ते २५ टन कचरा जमा होतो. २००७ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीत समुद्रातील गाळ काढण्यासाठी ५० कोटी मंजूर केले, ते खर्च न केल्याने परत गेले. समुद्रातील गाळ काढण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नाही. समुद्रातल्या डम्पिंग ग्राउंडवर काय तोडगा काढणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही. आता आम्ही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत.
मायक्रो प्लास्टीकचा धोका
मायक्रो प्लास्टीक म्हणजे प्लास्टीकचे अत्यंत सूक्ष्म कण. शृंगार आणि प्रसाधने साहित्यातून निर्माण होत असलेल्या प्लास्टीक प्रदूषणाकडेही कोणाचेच नाही. चेहरा आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठीही याचा वापर होतो. साहित्याच्या पॅकेजिंगसह सौंदर्य वाढविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टीकचे सॅशे, जे पाण्याच्या प्रवाहासोबत समुद्रात वाहून जातात, त्याचा फटका समुद्री जिवांना बसतो, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
१५ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
समुद्रात जमा होणाºया कचºयापैकी ६० ते ९० टक्के वस्तू या प्लास्टीकच्या असतात. प्रामुख्याने यामध्ये अर्धवट जळलेल्या सिगारेट, बॅग आणि खाद्यपदार्थांसाठी वापरलेले जाणारे प्लास्टीकचे डब्बे यांचा समावेश असतो. समुद्रातील ८०० हून अधिक प्रजातींना धोका निर्माण झाला असून १५ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.