Join us  

विधान परिषदेत आमदार बनले अन् विजयोत्सवाच्या रॅलीत कुणीतरी खिशातून ७५ हजार चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:50 PM

हा प्रकार समजताच म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांचे निकाल हाती आलेत. या निवडणुकीत विजयी उमेदवारांकडून विजयोत्सव साजरा करण्यासाठी जंगी रॅली काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशे, गुलाल उधळले जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यात कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयोत्सवाचा चांगलाच फटका बसला आहे. 

नेहमी गर्दीच्या ठिकाणी चोरांची टोळी सक्रीय होते परंतु आता स्पेशल इलेक्शनमधील विजयोत्सव साजरा करण्यासाठी होणाऱ्या गर्दीतही चोर हात साफ करतायेत का असा प्रश्न उभा राहतो. कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी थेट ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खिशातील ७५ हजार रुपये लंपास केल्याचं समोर आले आहे. 

हा प्रकार समजताच म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, निवडणुकीची मतमोजणी ज्याठिकाणी होती त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात मला उचलून घेतले त्यावेळी माझ्याकडे खर्चासाठी काही पैसे होते. मागील खिशात २५ हजार आणि पुढच्या खिशात ५० हजार रुपये हे पैसे कुणीतरी लंपास केले. हा प्रकार लगेच माझ्या लक्षात आला असं त्यांनी सांगितले. 

माझ्या दोन्ही खिशातून पैसे गेल्यानं मी कार्यकर्त्यांना अलर्ट केले. पण मला वाटलं नव्हतं असं काही होईल. ऐनवेळी कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी इतर खर्चासाठी ही रक्कम माझ्या खिशात होती असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले. त्यामुळे इलेक्शनच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची टोळी विजयी रॅलीत सक्रीय होती हे उघड झाले आहे. याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली असून त्याचा तपास सुरू आहे. 

भाजपानं पहिल्यांदाच विजय मिळवलाकोकण शिक्षक मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपानं उमेदवार उभा केला होता. याठिकाणी भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानं भाजपानं विजयाची पहिली सलामी दिली. परंतु त्यानंतर नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे भाजपाला जबर धक्का बसला.  

टॅग्स :भाजपा