एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला ७५ वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:10 AM2023-06-09T10:10:21+5:302023-06-09T10:10:54+5:30
मुंबई-लंडन प्रवासात होते ३५ मान्यवर प्रवासी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला गुरुवारी, ८ जून रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. ८ जून १९४८ रोजी या कंपनीच्या विमानाने मुंबई ते लंडन असा प्रवास करण्यासाठी आकाशात भरारी घेतली. हे विमान कैरो, जिनिव्हा यामार्गे लंडनला पोहोचले. कॅप्टन के. आर. गझदर या कुशल वैमानिकाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या हवाई प्रवासात विमानामध्ये ३५ प्रवासी होते. त्यामध्ये काही तत्कालीन संस्थानिक, उद्योजक, खेळाडू यांचा समावेश होता.
लॉकहीडच्या ७४९ए या विमानाने हा प्रवास केला होता. त्यानंतर दर आठवड्याला या विमानाद्वारे मुंबई ते लंडन व पुन्हा परत अशी फेरी होऊ लागली. ४० आसनी या विमानाचे नाव मलाबार प्रिन्सेस असे ठेवण्यात आले होते. ८ जून १९४८ रोजी मुंबईहून निघालेले हे विमान १० जून १९४८ रोजी लंडनमध्ये पोहोचले. परतीच्या प्रवासात हे विमान कॅप्टन डी. के. जटार यांनी चालविले.
या कंपनीच्या विमानसेवेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मुंबई ते लंडन हवाई प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सदर विमानात महाराज दुलिपसिंह होते. त्याशिवाय या विमानात केकी मोदी व त्यांच्या पत्नी, लेफ्टनंट कर्नल डब्ल्यू ग्रे, भट्टी गुलाम मोहम्मद, नरोत्तम व सुलोचना लालभाई, एच. आर. स्टिमन्स, भारतीय सायकलपटू एच. बी. माल्कम, आर. आर. नोबल आदी मान्यवर प्रवासी होते. एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाबद्दल भारतीय टपाल खात्याने एक विशेष टपाल तिकीट १९४८ साली जारी केले होते.
जेआरडी टाटा होते विमानातील प्रवासी
- भारतातील अग्रगण्य उद्योगपती, उत्कृष्ट विमानचालक व कालांतराने टाटा ग्रुपचे चेअरमन बनलेले जे. आर. डी. टाटा आपल्या पत्नीसह एअर इंडियाच्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात विमानातील प्रवासी म्हणून सहभागी झाले होते.
- भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सदिच्छा संदेश जे. आर. डी. टाटा यांनी मुंबई-लंडन विमान प्रवासात इजिप्त, ब्रिटनचे पंतप्रधान, स्वित्झर्लंडचे पंतप्रधान यांची भेट घेऊन त्यांना दिला होता.
- या तीनही ठिकाणी विमान काही वेळ उतरविण्यात आले होते.