मुंबई - केंद्र सरकारने ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय समोर ठेवले आहे. फेब्रुवारी २०२३ च्या निर्यातीची आकडेवारी पाहिली तर मागील वर्षीच्या निर्यातीचे ध्येय आपण ओलांडले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी व्यक्त केला.
अंधेरी येथील निर्यात पतहमी महामंडळ (ईसीजीसी)च्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन कल्पना आणण्यासाठी आणि २०३० पर्यंत देशाची निर्यात २ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत म्हणजेच वस्तू आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रात डॉलरची निर्यात एक ट्रिलियनपर्यंत नेण्याच्या भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक बनण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो यासाठी ईसीजीसीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. ईसीजीसीने काळानुरूप आधुनिक बनत आपल्या व्यवहारात अधिकाधिक डिजिटल साधने वापरावीत, ज्यामुळे या संस्थेची कार्यक्षमता वाढेल, निर्यातदारांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि कामगिरीदेखील सुधारेल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करायचाय
आपल्याला आपल्या मुलांसाठी असा भारत निर्माण करायचा आहे जो पूर्णतः भ्रष्टाचारमुक्त असेल. त्यामुळे कोणत्याही अनियमित, बेकायदा व्यवहार करणाऱ्यांबाबत आपल्याला कठोर राहावे लागेल.
त्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र, ईसीजीसीसारखी मंडळे, एक्झिम बँक आणि इतर भागधारक या सगळ्यांनी मिळून पूर्ण प्रयत्न करायला हवेत.
ईसीजीसीने जागरूक असायला हवे, आपल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता आणायला हवी, सहकार्याची भावना असावी, शक्य तेवढे व्यवहार ऑनलाइन असायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.