मुंबई : मुंबईत सध्या १३ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ९ हजार २७५ रुग्ण लक्षणेविरहीत आहेत, तर सक्रिय रुग्णांत ७५० गंभीर रुग्णांचा समावेश आहे. मार्च ते सप्टेंबर या कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर सध्या कमी झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
सध्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनचा वापरही कमी झाल्याचे पालिका प्रशासनाने नमूद केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. ९ सप्टेंबरपर्यंत ऑक्सिजनचा वापर दुपटीने म्हणजेच ८५० मेट्रिक टन झाला होता. तोच १ जुलैपर्यंत ४५० मेट्रिक टन एवढा होता. कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात ऑक्सिजनचा पुरवठ्याची अधिक गरज होती, आता हा ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. सध्या संक्रमण काळाच्या तुलनेत ऑक्सिजनची २० टक्के मागणी आहे. मात्र, ऑक्सिजनची उपलब्धता अजूनही सुरळीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात २४ मॅन्युफॅक्चरर्स असून, त्यांच्याकडून ९५० ते १०५० मॅट्रिक टन उत्पादन घेतले जाते, ६६ रिफिलर्स त्यांना मदत करत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय विभागासाठी पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ऑक्सिजनचा साठा हा नियमितपणे रिफिलिंग करण्यात येतो, अशी माहिती काकाणी यांनी दिली आहे.