बेस्टच्या मदतीस पालिकेचा आखडता हात ७५० कोटींचे साहाय्य; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांहून कमी तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:03 AM2021-02-04T08:03:26+5:302021-02-04T08:03:53+5:30

Best News : उत्पन्नात घट झाल्याने पालिकेची स्थिती नाजूक असताना बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत मिळेल, याबाबत साशंकता होती. मात्र पालक संस्था या नात्याने पालिकेने बेस्टची जबाबदारी स्वीकारल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

750 crore assistance from BEST; Less than 50 per cent provision this year as compared to last year | बेस्टच्या मदतीस पालिकेचा आखडता हात ७५० कोटींचे साहाय्य; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांहून कमी तरतूद

बेस्टच्या मदतीस पालिकेचा आखडता हात ७५० कोटींचे साहाय्य; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांहून कमी तरतूद

Next

मुंबई  - उत्पन्नात घट झाल्याने पालिकेची स्थिती नाजूक असताना बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत मिळेल, याबाबत साशंकता होती. मात्र पालक संस्था या नात्याने पालिकेने बेस्टची जबाबदारी स्वीकारल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७५० कोटींचे आर्थिक साहाय्य आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकीपोटी अत्यंत कमी व्याजदराने ४०६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येईल. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मोठा दिलासा मिळेल. मात्र, असे असले तरी गेल्यावर्षीपेक्षा मदत देण्यात पालिकेने आखडता हात घेतला आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही तरतूद ५० टक्क्यांहून अधिक कमी केली आहे.

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमावरील आर्थिक तूट वर्षागणिक वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग बेस्ट उपक्रमाकडे नसल्याने पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. सन २०१९-२०२० मध्ये तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तब्बल २१५० कोटींची आर्थिक मदत बेस्ट उपक्रमाला जाहीर केली. मात्र खर्चाचा हिशेब बेस्ट प्रशासनाने न दिल्याने आगामी वर्षात या मदतीला कात्री लागण्याची शक्यता होती. परंतु, पुढच्या वर्षी पालिकेची निवडणूक असल्याने अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाचा पुरेपूर विचार करण्यात आला. मात्र आर्थिक मदत करताना खर्च कमी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मोठ्या सुधारणा करण्याची गरज असल्याचे खडेबोल आयुक्तांनी सुनावले. पुनरुज्जीवनाच्या पर्यायांचा विचार, तूट कमी करणे, आर्थिक स्थितीत जलद सुधारणेसाठी सल्लागार नियुक्तीची शिफारस आयुक्तांनी केली.

आतापर्यंत केली तीन हजार कोटींहून अधिकची मदत
 कोविड काळात बेस्ट उपक्रमाने आपल्या ३५०० बससह एसटीच्या एक हजार गाड्या घेऊन मुंबईकरांना परिवहन सेवा दिली. यासाठी पालिकेने बेस्टला ३३.८० कोटींचे अनुदान दिले. यासाठी आता अर्थसंकल्पात ६० कोटींची सुधारित तरतूदही करण्यात आली आहे. बेस्टला आतापर्यंत तीन हजार कोटींहून जास्त मदत करण्यात 
आली आहे.
 बेस्टमध्ये सेवा बजावताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १०१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसाहाय्यही करण्यात येणार आहे. तसेच सेवानिवृत्त ३६४९ कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी रक्कम देता यावी, यासाठी अल्प व्याजदरावर ४०६ कोटी रुपये कर्ज देण्याचे प्रस्तावित आहे.

Web Title: 750 crore assistance from BEST; Less than 50 per cent provision this year as compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट