750 प्रशिक्षणार्थी पीएसआयच्या पदांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:50 PM2020-01-05T20:50:53+5:302020-01-05T20:50:57+5:30
गृह विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश नुकतेच आदेश काढण्यात आले होते.
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य पोलीस दलात निवडण्यात आलेल्या ७५० प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या प्रशिक्षणाचा ५५ दिवसांची मुदत वाढविण्यात आलेली आहे. निवडणूक व त्यानंतर अधिवेशन काळातील बंदोबस्तासाठी त्यांना तैनात करण्यात आल्याने ही मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा या कालावधीत प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. गृह विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश नुकतेच आदेश काढण्यात आले होते.
राज्य लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या उपनिरीक्षक पदाच्या सरळ सेवेतून परीक्षेतून ७२४ उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली होती. त्याशिवाय सत्र क्रमांक ११४ मधील मुदतवाढ मिळालेल्या २६ उमेदवार अशी असून ७५० उमेदवारांची नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली होती.
मात्र या कालावधीत त्यांना निवडणूक व हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणामध्ये गेल्यावर्षी २४ ऑक्टोंबर ते १७ डिसेंबर या कालावधीचे प्रशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे ५५ दिवसांचा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बनविण्यात आला होता. गृह विभागाने त्याला मंजुरी दिली असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.