Join us

यूटीएस ॲपवर प्रवाशांच्या उड्या, ७,५३५ लाखांची झाली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 8:15 AM

तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कोरोनानंतर प्रथमच एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत यूटीएस ॲपद्वारे तिकीट काढण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा ६.३९ लाख जणांनी तिकीट बुकिंगसाठी वापर केला आहे.   

यूटीएस ऑन मोबाइल ॲप पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात उपलब्ध आहे. तिकीट मिळवण्याचा हा मार्ग रेल्वे प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. अधिकाधिक लोक हे ॲप वापरत आहेत, ज्यामुळे तिकीट विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

 चालू आर्थिक वर्षामध्ये, एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत मोबाईल ॲपद्वारे विकल्या गेलेल्या एकूण तिकिटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.   मार्च २०२०  मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत कोरोनामुळे मोबाइल ॲपवरील यूटीएस बंद होते. हे मोबाईल ॲप पुन्हा लॉन्च केल्यामुळे प्रवाशांनी त्याचा फायदा पाहून पुन्हा त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.  चालू वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान ६.३९ लाख प्रवाशांनी मोबाइल ॲपवर यूटीएसद्वारे त्यांची तिकिटे बुक केली होती. त्यामुळे ७,५३५ लाख रुपयांची कमाई झाली, जी पूर्वीच्या याच कालावधीत ६,०८१ लाख होती.

यूटीएस मोबाईल ॲप सुरू करण्याचा मुख्य उद्देश डिजिटल तिकीट विक्रीला प्रोत्साहन देणे,  शिवाय रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील ताण कमी करणे आहेत. अलीकडेच, रेल्वेने यूटीएस मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्यासाठी प्रतिबंधित अंतरामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे यूटीएसला पसंती देणाऱ्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :रेल्वे