Join us

पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त कामगारांच्या निवृत्तीवेतनात ७.५५ टक्के वाढ

By admin | Published: July 10, 2015 3:20 AM

प्रमुख बंदरातील सव्वा लाख सेवानिवृत्त कामगारांच्या मूळ निवृत्तीवेतनात ७.५५ टक्के एवढी वाढ होणार आहे, असा आदेशच नौकानयन व परिवहन मंत्रालयाचे सचिव अनुराग शर्मा यांनी दिला.

मुंबई : प्रमुख बंदरातील सव्वा लाख सेवानिवृत्त कामगारांच्या मूळ निवृत्तीवेतनात ७.५५ टक्के एवढी वाढ होणार आहे, असा आदेशच नौकानयन व परिवहन मंत्रालयाचे सचिव अनुराग शर्मा यांनी सर्व पोर्ट ट्रस्टच्या व डॉक लेबर बोर्डाच्या अध्यक्षांना दिला आहे. आदेशानुसार, १ जानेवारी २०१२ पूर्वी निवृत्त झालेल्या पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त कामगारांना मूळ पगाराच्या ७.५५ टक्के वाढ आणि थकबाकी १ जानेवारी २०१२ पासून मिळणार आहे, अशी माहिती आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस सुधाकर अपराज यांनी प्रसारमाध्यमांना दिली. १ जानेवारी २०१२ पासून बंदर व गोदी कामगारांना आॅक्टोबर २०१३ च्या वेतन करारानुसार मूळ वेतनाच्या १०.५ टक्के पगारवाढ आणि थकबाकी मिळालेली नाही. सेवानिवृत्त कामगारांनाही एकत्रीकरण निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी बंदर व गोदी कामगारांच्या पाच महासंघांनी केंद्राला केली होती. केंद्राने नियुक्त केलेल्या समितीनेही वाढ मिळावी, असा अहवाल केंद्राला सादर केला होता. त्यानुसार, केंद्राने पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त कामगारांच्या निवृत्तीवेतनात ७.५५ टक्के वाढ देण्याची मागणी मान्य केली आहे. (प्रतिनिधी)