मुंबई - कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात ७५७ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १३३८ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र मुंबईत सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ७० हजार १९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९७ टक्के म्हणजे सात लाख ४७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी २८० बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३७०३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरणा रुग्ण वाडी चा दैनंदिन सरासरी दर ०.०५ टक्के एवढा झाला आहे.
कोविड चाचण्यांमध्ये वाढ-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर दररोजचा चाचण्यांचे प्रमाण २८ ते ३० हजार एवढे होते. मात्र मागील दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ दिसत आहे. दररोजच्या कोविड चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शनिवारी ४१ हजार ४२७ लोकांची चाचणी करण्यात आली. तर आतापर्यंत एक कोटी ३४ लाख १४ हजार ३९ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
सहाव्यांदा एकही मृत्यू नाही-
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र नियंत्रणात आहे. मागील महिन्याभरात दररोज एक किंवा दोन मृत्यूची नोंद होत आहे. तर आतापर्यंत सहावेळा एकही कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत १६ हजार ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.