Coronavirus In Maharashtra: पाच जिल्ह्यांत 76 टक्के सक्रिय रुग्ण; मुंबईने पुण्यालाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:56 AM2021-11-07T06:56:08+5:302021-11-07T06:56:38+5:30
काेरोनाच्या ३८१९ सक्रिय रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आली असून या वेळेस मुंबईने पुण्यालाही मागे टाकले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७६ टक्के सक्रिय रुग्ण असून मुंबई, पुणे, अहमदनगर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील आहेत.
दरम्यान, राज्यात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनावरील भार सद्यःस्थितीत कमी असला तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रासह मुंबईत दिवाळीचा उत्साह वाढला आहे. त्यातच राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत सक्रिय रुग्ण जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे.
मुंबईत ३८१९ सक्रिय रुग्ण नोंदले गेले आहेत, याचे प्रमाण २८.९५ टक्के आहे. त्यापाठोपाठ पुण्यात ३१६३ सक्रिय रुग्ण असून २०.६४ टक्के प्रमाण आहे. अहमदनगरमध्ये २०७९ सक्रिय रुग्ण आहेत, तर ठाण्यात १६३२ (१०.४०) टक्के आणि रायगडमध्ये ६९३ रुग्ण असून ४.०१ एवढे प्रमाण आहे. राज्यात सध्या १४,७१४ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या एक ते दोन महिन्यांपूर्वी दुप्पट होती. मात्र आता या एकूण संख्येत घट झाली आहे.
राज्यात एकूण ९ कोटी ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस
राज्यात दिवसभरात ३१ हजार ७१९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ९ कोटी ९० लाख ८० हजार १८९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ७२ लाख ८१ हजार ९२७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ६१ लाख ७६ हजार १७४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ३ कोटी ६९ लाख ५९ हजार १७३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी २२ लाख ५३ हजार २८५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. राज्यात १२ लाख ९३ हजार ९०९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११ लाख १९ हजार ९९० आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
१५,११९ सक्रिय रुग्ण
राज्यात २६ ऑगस्ट रोजी ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण होते. तर यानंतर एक महिना उलटून म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी राज्यात ३७ हजार ८६० एवढी सक्रिय रुग्णसंख्या नोंद करण्यात आली. २५ ऑक्टोबर रोजी २३ हजार १८४ सक्रिय रुग्णसंख्या नोंद करण्यात आली होती, तर सध्या १५,११९ एवढी सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांत मुंबई सक्रिय रुग्णांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती, मात्र या नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आली आहे.