मुंबईत पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात ७६ टक्के विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:58 AM2019-07-19T05:58:21+5:302019-07-19T05:58:26+5:30
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत मुंबईतील तब्बल ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत मुंबईतील तब्बल ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून त्यातील ३७ हजार २०० म्हणजे ७६ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ११,६७२ म्हणजे २३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. असे असूनही ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. साहजिकच प्रवेश न घेतलेल्या जागा २२ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध होतील.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १,३४,४६७ विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या. त्यातील ६१,६४५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७२,३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली.
या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ४८,८७२ विद्यार्थ्यांनाच मिळाले. त्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांनी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले. तर, २३ टक्के विद्यार्थ्यांनी ते घेतले नसल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास तो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. त्याला पुन्हा प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी थेट विशेष फेरीची वाट पाहावी लागणार आहे.
>का नाकारले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय?
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे दहावीनंतरच्या डिप्लोमा तसेच आयटीआय या अभ्यासक्रमांकडे वळले असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
यासोबतच पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडून व्यवस्थापन, इनहाउस किंवा अल्पसंख्याक कोट्यामधून प्रवेश घेतले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.