७६ टक्के मुले शाळाबाह्य
By admin | Published: March 28, 2015 10:35 PM2015-03-28T22:35:06+5:302015-03-28T22:35:06+5:30
वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची सुमारे ७६ टक्के मुले शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती विधायक संसदच्या सर्वेक्षणामध्ये उघडकीस आली आहे.
ठाणे: वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची सुमारे ७६ टक्के मुले शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती विधायक संसदच्या सर्वेक्षणामध्ये उघडकीस आली आहे. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील ९१२ कुटुंबांची पाहणी केली आहे.
ठाणे व पालघर जिह्यांमधील आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करून विटभट्टयांवर काम करत आहेत. अशा आदिवासी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. या मुलांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधायक संसद या संस्थेने दोन्ही जिल्ह्यातील काही विटभट्टयांची पाहणी केली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तसेच पालघर जिल्ह्यातील वसई व वाडा या तालुक्यांमधील काही वीटभट्टीवर काम करणाऱ्या ९१२ कुटुंबांची पाहणी केली. त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील ६१४ बालके वीटभट्टीवर काम करताना आढळली. तर त्यातील ४६७ बालके म्हणजेच पाहणी केलेल्या बालकांपैकी तब्बल ७६ टक्के बालके शाळेतच जात नसल्याचे निदर्शनास आले. याचाच अर्थ वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या १०० बालकांपैकी ७६ बालके शाळेत जात नाहीत. (प्रतिनिधी)