सीबीएसईचे 76 हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 02:01 AM2021-04-18T02:01:51+5:302021-04-18T02:02:07+5:30

काही पालकांनी व्यक्त केले समाधान, काहींना हवी परीक्षा 

76,000 students of CBSE pass without examination | सीबीएसईचे 76 हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

सीबीएसईचे 76 हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

Next

 


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई मंडळाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई मंडळाकडून ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत नियोजित दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, मंडळाने  स्वतः तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येणार आहेत. 
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना या आधारावरील निकाल समाधानकारक वाटत नसतील त्यांना जून महिन्यात पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल आणि अनुकूल परिस्थितीत परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई सीबीएसई मंडळाच्या पुणे विभागात येत असून, मागील वर्षी सीबीएसईच्या ७६ हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातून नोंदणी केली होती. यावर्षीसुद्धा ७६ हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या निर्णयामुळे पुणे विभागातील सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीबीएसई मंडळाने घेतलेल्या निर्णयावर ही प्रतिक्रिया देणाऱ्या पालकांचे २ गट आहेत. दहावीची‌ म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे परीक्षा न घेता दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नाही, असे मानणारा पालकांचा एक गट आहे, तर या अवतावरणात विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा सुरक्षितता आणि कौशल्यावर आधारित गुण देऊन त्यांचे वर्ष वाचविणे हा उपाय आहे, असे मत मांडणारा दुसरा गट आहे. राज्य शासनाने सीबीएसई‌प्रमाणे निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट मत राज्यातील शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. 

सीबीएसईच्या परीक्षा ऑनलाइन का नाही?
अनेक पालक विद्यार्थ्यांनी केंद्राच्या या निर्णयावर परीक्षा ऑनलाइन का नाही घेतल्या गेल्या यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये अगदी विनाअनुदानितपासून जिल्हा परिषदेच्या अनुदानित, ग्रामीण भागातील शाळांचा समावेश होतो. त्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने राज्य शिक्षण मंडळाला ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. मात्र, राज्यातील किंवा देशातील बहुतांश सीबीएसई शाळा जिल्हा भागात, शहरी भागांत असून, सुसज्ज तंत्रज्ञान असलेल्या आहेत. अशा परिस्थितीत दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाइन परीक्षांची यंत्रणा का नाही, असे प्रश्न काही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.
पालक प्रतिक्रिया 
दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने परीक्षा घ्यावी. परीक्षा‌ रद्द करण्याची घाई करू नये. विद्यार्थांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे योग्य नाही.-शैलजा नाईकवार, पालक 

परीक्षेतील गुणांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. निर्णय योग्यच असून, पुढील टप्प्यांवर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाऊ शकते आणि तशा संधीही आहेत. 
-गिरीश कळसुंबे, पालक

Web Title: 76,000 students of CBSE pass without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.